(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कनकाडी खालची गुरववाडी येथे गुरुवारी सायंकाळी एका गोठ्याला लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा आगीच्या भक्षस्थानी पडून सुमारे पाच लाखांचे मोठे नुकसान झाले. या आगीत शेतीसाठी लागणारी अवजारे, कृषी साहित्य, तसेच दुचाकी आणि मोबाईलसह अनेक वस्तू जळून खाक झाल्या.
लक्ष्मीकांत शंकर गाताडे यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात जनावरे नसल्याने त्यांनी शेतीसाठीची सर्व साधने ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात ठेवलेले एक नवीन १२५ सीसी शाईन दुचाकी, ७.५ एचपीचा पॉवरटिलर, दोन ग्रास कटर, एअर कॉम्प्रेसर, वेल्डिंग मशीन, पाण्याच्या ५०० लिटर क्षमतेच्या तीन टाक्या, एचडीपी पाईपची तीन बंडले, फवारणी पंप, हॉलोजन लाईट व वायरिंग, ग्रीन नेट, पाण्याचे दोन ड्रम तसेच वैयक्तिक मोबाईल पूर्णतः जळून खाक झाले. पक्क्या बांधणीचा गोठाही या आगीत उद्ध्वस्त झाला.
गाताडे यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून सर्व कृषी अवजारे आगीत नष्ट झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर चरितार्थाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीचे वृत्त समजताच सरपंच संतोष गाताडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच तलाठी त्रुप्ती डोंगरे यांनीही पंचनामा करून नुकसानीचा अहवाल नोंदवला आहे.

