(देवळे / प्रकाश चाळके)
अंगवली येथून श्री मारलेश्वर देवाची पालखी कल्याण सोहळ्यासाठी म्हणजेच लग्नं सोहळ्यासाठी आंगवलीच्या मुख्य मंदिरातून 13 जानेवारी रोजी रात्री बारा वाजता सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गुहेतील मंदिराकडे प्रस्थान करताना भाविकांकडून होणारी फुलांची बरसात आणि मुरादपुरातील भोईराजांच्या खांद्यावरून डोळ्याची पाते लवते न लवते तोच दिसेनाशी होणारी श्री देव मार्लेश्वरांची पालखी.
तसेच पालखी पुढे रोहिदास समाजाचा मानकरी दिवटी धरून धावत असतो त्याच्या पाठोपाठ दिवसांच्या प्रकाशात भोईराज पालखी घेऊन धावत असतात. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भावीकांचा महासागर लोटलेला असतो. हा सोहळा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा याची देही याची डोळा पाहणाऱ्या भक्तांनी धन्य झाल्याचे म्हटले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसह येथे असलेल्या मान-माणकऱ्यांसह हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला गेला. या देवाच्या लग्नाचा सोहळा माणसांच्या लग्नासारखा साजरा केला जातो तसेच साखरपा येथील श्रीदेवी गिरजाई यांचा हा विवाह सोहळा याला कल्याणविधी असं म्हटलं जातं.

