(संगमेश्वर / एजाज पटेल)
होय, धूर सोडणाऱ्या एसटी बसेस रस्त्यावर धावत असल्याची बातमी खरी आहे. अनेक ठिकाणी शहरांपासून खेड्यांपर्यंतच्या रस्त्यांवर महामंडळाच्या बसेस काळा धूर ओकत धावताना दिसतात. प्रवाशांकडून तक्रारी येत आहेत की, अशा बससेमुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर प्रवाशांना श्वसनासंबंधी त्रासही सहन करावा लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळ खासगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत कोसो दूर राहिले आहे, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. आधीच तिकीट दरातील प्रचंड वाढीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यातच रस्त्यावर धावणाऱ्या भंगार बस प्रदूषण वाढवत आहेत. विशेष म्हणजे, या लालपऱ्या केव्हा बंद पडतील याचा नेम नाही.
देवरुख आगारात अनेक बसेस जुन्या आहेत. दुरुस्ती करून प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या काही बसेस लांबपल्ल्याच्याही आहेत. मात्र जिल्ह्यात धावणाऱ्या बहुतांश बसेसची अवस्था बिकट आहे. खिळखिळ्या बस, तुटलेली तावदाने, फाटलेल्या सीट्स, पावसाळ्यात टपातून गळणारे पाणी आणि तंबाखूच्या पिचकऱ्यांनी माखलेल्या भिंती यामुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे.
बस प्रवास सुरक्षित मानला जातो, परंतु बिकट स्थितीतील बसेस आणि वाढलेले तिकीट दर पाहता प्रवाशांनी एसटीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. दरम्यान, दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होतो; मात्र कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. चालक आणि वाहक नादुरुस्त गाड्या घेऊन कर्तव्य म्हणून निघतात; पण रस्त्यात बस बंद पडल्यास प्रवाशांचा रोष त्यांनाच सहन करावा लागतो. महामंडळाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
एसटी बसेसना पीयूसी कोण देते?
सामान्य वाहनांना प्रदूषणामुळे पीयूसी नाकारले जाते; पण एसटी महामंडळाच्या धूर ओकणाऱ्या बसेसला पीयूसी कसे दिले जाते, असा प्रश्न प्रवासी व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.