(गुहागर)
गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द (आंबेकरवाडी) येथील सुपुत्र, ज्येष्ठ नागरिक गणपत महादेव आंबेकर (वय ८०) यांचे शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता मुंबईतील विलेपार्ले येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
उमराठ खुर्द आंबेकरवाडी तसेच संपूर्ण गावाच्या विकास, धार्मिक उपक्रम आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचा सक्रिय व मोलाचा सहभाग होता. ग्रामविकासातील इतर आधारस्तंभांसोबत ते एक महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून कार्यरत राहिले. समाजकार्यातील त्यांचे मार्गदर्शन, समंजस स्वभाव आणि कार्यतत्परता सर्वांना प्रेरणादायी होती.
स्वभावाने समंजस, हसमुख, स्मितभाषी, मनमिळावू व परोपकारी असे गणपतभाऊ सर्व वयोगटातील लोकांमध्ये प्रिय होते. त्यांच्या सडपातळ, मध्यम उंचीच्या व्यक्तिमत्त्वामागे सदैव उत्साही आणि सर्जनशील मन दडलेले होते.
माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एअर इंडिया या कंपनीत इलेक्ट्रिक इंजिनिअर टेक्निशियन म्हणून कार्य केले व त्याच पदावरून सेवानिवृत्ती घेतली. त्यांना फोटोग्राफीची गाढ आवड होती आणि विविध कलागुणांनी ते संपन्न होते.
मुंबईत नोकरी करत असतानाही त्यांनी आपल्या मूळ गावी उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग कायम ठेवला होता. कोकणातील प्रसिद्ध लोककला “नमन” या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. उमराठ खुर्द आंबेकरवाडीच्या प्रसिद्ध संगीत नमन मंडळाचे ते एक अविभाज्य सदस्य होते. कलाकार म्हणून त्यांनी अनेक वगनाट्यांमध्ये भूमिका साकारल्या.
‘संत सखू’ मधील वासूनाना ही त्यांची प्रभावी भूमिका तसेच ‘मासा का हसला?’ या विनोदी फार्समधील कडकलक्ष्मी ही जोशपूर्ण भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
नमन कार्यक्रमातील लाईटिंग आणि ट्रिक सीन या तांत्रिक भागात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या कल्पकतेने उभारलेल्या दृश्यांनी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणावा असे प्रभावी दृश्य परिणाम निर्माण होत. श्रियाळ चांगुणा, पतिव्रता अनुसया, सत्यवान सावित्री आणि हरिश्चंद्र तारामती यांसारख्या पौराणिक वगनाट्यांतील त्यांच्या ट्रिक सीनने अनेकांना थक्क केले होते. त्यांच्या अशा अष्टपैलू आणि कल्पक व्यक्तिमत्त्वाने उमराठ खुर्द आंबेकरवाडीचा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रसाद, सुनबाई, चार मुली, नातवंडे आणि बंधुभगिनी असा मोठा परिवार आहे. उमराठ खुर्द आंबेकरवाडी प्रतिष्ठानतर्फे, ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे आणि सरपंच जनार्दन आंबेकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

