(गुहागर/ रत्नागिरी)
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा वेळणेश्वर येथे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंजली अमोल पाटील (वय अंदाजे २०, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ओझरवाडी परिसरातील ती राहत असलेल्या खोलीत २० ऑक्टोबर रोजी रात्री ती मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली पाटील ही वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती ओझरवाडी येथे सिताराम सोमा मोरे यांच्या घरी भाड्याने राहत होती. २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.०८ वाजण्यापूर्वी ती राहत्या खोलीतील पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नोंद घेतली. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे १.५७ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट झालेली नसून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.


