(वेंगुर्ले)
शिरोडा वेळागर समुद्रकिनारी ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सात पर्यटकांपैकी उर्वरित दोन मृतदेह आज (रविवारी) सापडले आहेत. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
शिरोडा वेळागर येथे शुक्रवारी कुडाळ आणि बेळगाव येथील पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील सात इसम समुद्रात बुडाले होते. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले होते, या दुर्घटनेत एक तरुणी आणि एक इसम वाचले होते. अन्य चार जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी दोन मृतदेह शुक्रवारी रात्री आणि शनिवारी आढळले होते, तर उर्वरित दोन मृतदेह आज (रविवारी) सापडले.
इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६, रा. लोंढा, बेळगाव) यांचा मृतदेह सकाळी १०.५६ वाजता केळूस निवती येथे समुद्रातून बाहेर काढण्यात आला. तर जाकीर निसार मणियार (वय १३, रा. कुडाळ-पिंगुळी) याचा मृतदेह वेंगुर्ले नवाबाग येथील समुद्रामधून दुपारी १२ वाजता बाहेर काढला गेला.
शोधमोहीमेसाठी मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या आदेशान्वये मत्स्य विभागाचे ड्रोन आणि महसूल प्रशासनाचे यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले होते. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमार यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविण्यात आली होती.
मृतांची नावे:
- फरहान इरफान कित्तूर (वय ३४, रा. लोंढा, बेळगाव)
- इबाद इरफान कित्तूर (वय १३, रा. लोंढा, बेळगाव)
- नमीरा आफताब अख्तर (वय १६, रा. अल्लावर, बेळगाव)
- इक्वान इमरान कित्तूर (वय १५, रा. लोंढा, बेळगाव)
- फरहान मोहम्मद मणियार (वय २०, रा. कुडाळ-पिंगुळी, सिंधुदुर्ग)
- इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६, रा. लोंढा, बेळगाव)
- जाकीर निसार मणियार (वय १३, रा. कुडाळ-पिंगुळी, सिंधुदुर्ग)

