(ठाणे)
उल्हासनगर येथील शासकीय महिला सुधारगृहातून तब्बल 12 महिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. त्यातून आठ महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित चार महिला अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमार्फत पीटा कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर संबंधित महिलांना उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, काल रात्री काही महिलांनी अंधाराचा फायदा घेत भिंतीवरून उडी मारून, तर काहींनी मुख्य प्रवेशद्वाराजवळून पळ काढला.
या घटनेनंतर सुधारगृहातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वी देखील याच परिसरातील मुलींच्या वसतिगृहातून अनेकदा मुली पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.
या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा आठ महिलांना शोधून काढण्यात यश आले असून, उर्वरित चार फरार महिलांचा शोध सुरू आहे.
गेल्या जून महिन्यातही उल्हासनगर येथील शासकीय निरीक्षण गृह आणि विशेष गृहातून 15 ते 17 वयोगटातील आठ मुलींनी शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पलायन केले होते. त्या वेळी पोलिसांनी तातडीने मोहीम राबवून सात अल्पवयीन मुलींना उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यामुळे सुधारगृहातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

