(मुंबई)
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मोठी वाढ होत असून काही ठिकाणी साठेबाजीमुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त पुरवठा केला जात असला तरी कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरासरीपेक्षा इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. पेट्रोलच्या वापरापेक्षा २३ टक्के अधिक पुरवठा करण्यात येत असून, डिझेलच्या मागणीत तब्बल ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे.”
काही जिल्ह्यांत डिझेलची मागणी ७० टक्क्यांहून अधिक
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये डिझेलची मागणी ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. एवढी वाढ होऊनही शेतकऱ्यांना डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्याचवेळी काहीजण मोठ्या प्रमाणावर डिझेल साठवून ठेवत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचा संशय सरकारला आहे. “साठेबाजी करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
कांदा खरेदी दरात वाढ; केंद्र सरकारची उद्या बैठक
दरम्यान, कांदा प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा खरेदी दरात साडेतीन रुपयांची वाढ करून तो जवळपास १५ रुपये प्रतिकिलोपर्यंत नेला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.
“राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकार उद्या या विषयावर महत्त्वाची बैठक घेणार आहे. फक्त खरेदी दर वाढवून प्रश्न सुटणार नाही, तर दीर्घकालीन उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, “काही लोक या प्रश्नावर केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे.” तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देत, “पहिल्यांदाच खासदार झालेल्यांनी बोलताना भान राखले पाहिजे,” असा टोला लगावला.

