(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर परिसरात बंद असलेल्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ७ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासानुसार, ही घरफोडी २६ ते २८ जानेवारीदरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तेजस मोरेश्वर नगराळे (वय ३३, सध्या रा. नवी मुंबई) यांचे सन्मित्रनगर येथील घर काही दिवसांपासून बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजावरील कुलूप तसेच कडी-कोंयडा धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.
घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून फिर्यादींच्या आईचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. चोरी गेलेल्या ऐवजात सोन्याच्या बांगड्या, हार, कर्णफुले, साखळ्या, अंगठ्या, नथी, सोन्याचे मणी, चांदीचे पैंजण, चांदीची नाणी तसेच ४ हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. चोरी झालेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ७ हजार ९३० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीची माहिती मिळताच तेजस नगराळे हे नवी मुंबईहून रत्नागिरीत दाखल झाले. घराची पाहणी केल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

