(रत्नागिरी)
नगरपरिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर महाविकास आघाडीला लागोपाठ धक्के बसत असतानाच रत्नागिरीतही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, आघाडीतून बाहेर पडलेले हे दोन्ही पक्ष आता रत्नागिरी शहरात एकत्रित ताकदीने निवडणूक रिंगणात उतरतील, अशी घोषणा आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. त्यानुसार सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, ठरलेल्या सामंजस्यानंतरही शिवसेना (उबाठा) गटाच्या स्थानिक नेतृत्वाने काही प्रभागांमध्ये मित्रपक्षांतील उमेदवारांसमोर स्वतःचे उमेदवार उभे करून संतापाला तोंड फोडले. या बंडखोर उमेदवारांनी आज, शुक्रवार (२१ नोव्हेंबर) अर्ज मागे घ्यावेत, अशी स्पष्ट हमी काँग्रेस व राष्ट्रवादीकडील स्थानिक नेत्यांना दिली होती.
मात्र, अर्ज माघारीची अंतिम मुदत उलटल्यानंतरही शिवसेनेच्या (उबाठा) गटाने दिलेला शब्द जुमानला नाही. बंडखोर उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे न घेताच मुदत संपली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतून तात्काळ बाहेर पडत स्वतंत्र मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश किर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना प्रखर नाराजी व्यक्त केली. “शिवसेना (उबाठा) गटाच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेला शब्द फिरवला. ही विश्वासघाताची भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही रत्नागिरीतील महाविकास आघाडीत पुढे राहणार नाही,” असे किर यांनी स्पष्टपणे सांगितले. किर पुढे म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील नगरपरिषद निवडणूक एकत्रितपणे लढवणार आहेत. रत्नागिरीतील जनतेसमोर पर्यायी व दृढ नेतृत्व उभे करणार आहोत.”
या घडामोडींमुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात मोठे राजकीय समीकरण बदलले असून महाविकास आघाडीत आता शिवसेना (उबाठा) आणि काही अपक्ष-मित्रपक्ष एवढेच शिल्लक राहिले आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकीत नुकतेच तयार झालेले हे नवे राजकीय गठजोड स्थानिक राजकारणाला वेगळे वळण देणार, इतके निश्चित.

