(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी (बौद्धवाडी) येथील बॅन्जो पथकातील नामांकित ड्रम वादक संकेत महेंद्र कदम (वय 32) यांचे गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
संकेत कदम हे निवेंडी पंचक्रोशीत तरुण वयातील एक उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण ड्रम वादक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अप्रतिम ड्रम वादनामुळे त्यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपली छाप उमटवली होती. मुंबईसारख्या महानगरातील नामांकित बॅन्जो पथकांमध्येही त्यांनी आपली कला सादर करून प्रचंड वाहवा मिळवली होती.
त्यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक नामांकित पथकांमध्ये त्यांना ड्रम वादनासाठी विशेष निमंत्रण मिळत असे. गावाबरोबरच मुंबईतही त्यांना ड्रम वादन क्षेत्रात विशेष मान्यता मिळाली होती.
संकेतच्या निधनाची वार्ता समजताच पंचक्रोशीतील तसेच विविध गावांतील बॅन्जो पथकातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित झाला होते. आपल्या हसतमुख आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी अनेक ठिकाणी मित्रपरिवार जोडला होता. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संकेत यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, दोन बहिणी, काका, काकू व अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनानंतर वरची निवेंडी बौद्धजन पंचायत समिती (भीमनगर शाखा), भारतीय बौद्ध महासभा (शांतीनगर व समतानगर शाखा) तसेच स्थानिक बॅन्जो पथक व तरुण मंडळांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

