(चिपळूण)
चिपळूण नगर परिषद व पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
वक्तृत्व स्पर्धेत कु. वेदिका विष्णू हरवडे हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर निबंध स्पर्धेत कु. वैष्णवी गजानन हळदे हिला उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता गांधारेश्वर मंदिराजवळील महात्मा गांधी रक्षाकलशासमोर पार पडलेल्या समारंभात विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी प्रा. रुपेश भालेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. २८ सप्टेंबर २०२५ रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण येथे ही स्पर्धा पार पडली होती. सहभागाची दखल घेत महाविद्यालयाला पुस्तक भेटवस्तूही प्रदान करण्यात आली.
या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, चेअरमन मल्लेश लकेश्री, कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, रजिस्ट्रार अजित खेडेकर, पीआरओ योगेश चोगले, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अरुणा सोमण, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊ कांबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

