(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने शिवनेरी आणि शिवशाहीनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ या आधुनिक बसेसचा नवा ताफा सेवेत दाखल करण्यास सुरुवात केली असून रत्नागिरी विभागाला रविवारी तब्बल १८ नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर या अत्याधुनिक बसेस धावताना दिसणार आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक करण्याच्या उद्देशाने महामंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी राज्यभर ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्यात आली असली तरी रत्नागिरी विभागात या बसेस दाखल होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर रविवारी या बसेस रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर एसटी प्रशासनासह प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या नव्या बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात आले असून तीन बाय दोन आसनरचना करण्यात आली आहे. त्यामुळे एका वेळी ५५ प्रवासी आरामदायी प्रवास करू शकणार आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येऊ नये, यासाठी या बसेसची रचना करण्यात आली आहे. पांढरा आणि भगवा रंगसंगती असलेल्या या बसेसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्रणा तसेच प्रवाशांच्या सामानासाठी स्वतंत्र डिक्कीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आरक्षित आसनव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चार सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा आणि ‘पॅनिक बटण’ची सुविधा बसमध्ये बसविण्यात आली आहे. सार्वजनिक सूचना प्रणाली (पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम), अत्याधुनिक इंजिन आणि विद्युत मार्गफलक यामुळे या बसेस अधिक आधुनिक बनल्या आहेत.
दरम्यान, या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी गर्दी असलेल्या मार्गांवर ‘शटल सेवा’ म्हणून चालविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

