(मंडणगड / रत्नागिरी प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा तालुका मंडणगडच्या वतीने अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त २ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (स्मृतीभूमी) येथे भव्य धम्मदीक्षा समारंभ संपन्न झाला. या ऐतिहासिक कार्यक्रमाने संपूर्ण आंबडवे गाव धम्ममय झाले होते.
गेल्या ३५-३६ वर्षांपासून सतत कार्यरत असलेल्या संस्थेच्या अथक प्रयत्नांचे फळ म्हणून तालुक्यातील इतिहासात नोंद होईल, असा विराट कार्यक्रम पार पडला. तालुका अध्यक्ष हर्षद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. धम्मदीक्षा देण्यासाठी भंते ए. सुमेध बोधीजी उपस्थित होते. समारंभासाठी हजारो अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. प्रमुख मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य सविव संस्कार व जिल्हाध्यक्ष आद. अनंत सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष प्रदीप जाधव, जिल्हा सचिव (प्रचार) महेंद्र कदम, जिल्हा सचिव (संरक्षण) प्रकाश सुर्वे गुरुजी तसेच तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडणगड पंचायत समितीचे बीडीओ खरात, माणगाव पंचायत समितीचे बीडीओ विशाल जाधव, मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गवारे यांच्यासह डी.एन. मोरे, के.टी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील विविध शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वागताध्यक्ष म्हणून नरेंद्र सकपाळ, शरद धोत्रे व प्रमोद सकपाळ यांनी कार्यभार सांभाळला. कार्यक्रमाची प्रस्तावना शैलेश पवार यांनी मांडली तर सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रफुल खैरे व अमोल सकपाळ यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या भव्य सोहळ्यामुळे मंडणगड तालुक्याच्या सामाजिक-धार्मिक चळवळीला नवी दिशा मिळाल्याची भावना अनुयायांनी व्यक्त केली.

