(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा असून, त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अमोल मिटकरी अक्षरशः कोलमडून पडल्याचे चित्र आहे. रोखठोक शैली, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळे अजित पवार हे अनेकांसाठी आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे.
अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी अजित पवार हे केवळ पक्षनेते नव्हते, तर ते जीवनातील मार्गदर्शक आणि ताकद होते. निधनाची बातमी समजताच मिटकरींना अश्रू अनावर झाले. “आमचा सेनापतीच आम्हाला सोडून गेला. आता आम्ही कोणाच्या बळावर, कोणासाठी लढायचं?” असा आर्त सवाल करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या आक्रोशाने उपस्थित कार्यकर्तेही भावूक झाले.
‘आमचा योद्धा गेला, आता रणांगण कसं गाजवायचं?’
मिटकरी म्हणाले की, शून्यातून विश्व उभं करण्याची शिकवण देणारा नेता हरपल्याने आयुष्याचा मोठा आधारच निघून गेला आहे. “ज्यांनी मला लढायला शिकवलं, तोच योद्धा आज रणांगण सोडून गेला,” असे म्हणत ते धाय मोकलून रडताना दिसले. त्यांच्या शब्दांतून अजित पवारांबद्दलची निष्ठा आणि भावनिक नातं स्पष्टपणे दिसून येत होते.
देवगिरी बंगल्यावरील ‘चप्पल चोरी’चा भावनिक किस्सा
या दुःखाच्या क्षणी अमोल मिटकरी यांनी अजित पवारांसोबतचा एक अत्यंत भावूक किस्सा सांगितला. सामान्य कार्यकर्ता असताना अकोल्यात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मिटकरींना दादांनी आमदारकीची संधी दिली. नंतर मिटकरींनी स्वतःचे घर घेतले. त्या घरात दादांनी यावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. मात्र कामाच्या व्यापामुळे अजित पवारांना वेळ मिळू शकला नाही. दादांप्रती असलेल्या श्रद्धेपोटी मिटकरींनी चक्क देवगिरी बंगल्यावरून दादांची चप्पल चोरून आणली आणि आपल्या नव्या घरात तिची प्रतिष्ठापना करून पूजा केली. “दादा प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, तरी त्यांचं अस्तित्व घरात असावं,” ही त्यामागची भावना होती.
भाड्याच्या घरातून आमदारकीपर्यंतचा प्रवास
अमोल मिटकरींच्या संघर्षकथेत अजित पवारांचे योगदान किती मोठे होते, हे त्यांनी सांगितले. सहा वर्षांपूर्वी स्वतःचे घर नसताना अजित पवारांचा फोन आला आणि “आमदार करतो” अशी ग्वाही दिली. उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे नसतानाही दादांनी वकील देऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यांच्या विश्वासामुळेच एका सामान्य कार्यकर्त्याचे आमदारात रूपांतर झाले, असे मिटकरी भावूकपणे सांगत होते. आज स्वतःचे घर, ओळख आणि स्थान आहे; मात्र ज्यांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले, तो नेता आज नाही, ही सल त्यांच्या शब्दांतून स्पष्ट दिसत होती.
‘तलवारी म्यान केल्या, कार्यकर्ते अनाथ झाले’
“आम्ही आज आमच्या तलवारी म्यान केल्या आहेत. ज्यांच्या आदेशावर रणांगण गाजवायचो, तो सेनापतीच अनंतात विलीन झाला,” असे म्हणत मिटकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचे छत्र हरपले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, प्रत्येक डोळा ओलावलेला दिसत आहे.
वादग्रस्त ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
दरम्यान, अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका भावनिक आणि वादग्रस्त ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कथित विमान अपघाताच्या अफवांवरून प्रश्न उपस्थित होत असताना मिटकरींनी ट्वीटमध्ये, “माझा विश्वास आहे, दादा असे जाऊच शकत नाहीत. ज्यांनी हा देवमाणूस हिरावून नेण्याचं पाप केलं असेल, भविष्यात त्यांच्या घरात चिता जाळणारा कुणी उरणार नाही. देवा, तुला कुठे शोधायचं?”
अशा तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या.
याआधीही त्यांनी मृत्यूच्या आधीच्या घटनाक्रमावर प्रश्न उपस्थित करत “गेल्या तीन दिवसांपासून मनात शंकेचं काहूर आहे,” असे म्हटले होते. मात्र कोणतीही अधिकृत माहिती नसताना अशा पोस्टमुळे संभ्रम निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या चर्चांवर प्रश्न उपस्थित केले होते.
प्रशासन किंवा अधिकृत यंत्रणांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नसल्याने, या ट्वीट्समुळे अनावश्यक गोंधळ निर्माण होत असल्याची टीकाही होत आहे. अमोल मिटकरींच्या वक्तव्यांमुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

