(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे विहिरीत पडलेल्या नाग जातीच्या सापाला केळ्ये येथील सर्पमित्र गुरुनाथ बाचरे आणि मोरेश्वर बाचरे यांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मजगावच्या बाग स्टॉप परिसरातील हसीना इब्जी यांच्या मालकीच्या विहिरीत चार दिवसांपासून एक नाग पाण्यावर तरंगत होता. विहिरीत साप असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना मदतीसाठी विनंती केली. मात्र कोणीही विहिरीत उतरायला तयार नसल्याने परिस्थिती गंभीर बनली.
शेवटी हसीना इब्जी यांनी गावचे सरपंच फैयाज मुकादम व समाजसेवक मकबूल मुकादम यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मकबूल मुकादम यांनी डबल दोरी विहिरीत सोडून प्राथमिक प्रयत्न केले. यानंतर सरपंचांनी सर्पमित्र गुरुनाथ बाचरे यांना संपर्क केला.
गुरुनाथ बाचरे, मोरेश्वर बाचरे आणि वैभव धुळप यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन शिताफीने बचाव मोहीम राबवली. दोरीच्या सहाय्याने नागाला सुरक्षितपणे वर काढण्यात आले. त्यानंतर बाचरे बंधूंनी नागाला काळजीपूर्वक डब्यात भरून मोठ्या जंगलात सोडून दिले.
या यशस्वी मोहिमेमुळे नागाचे प्राण वाचलेच नाहीत, तर स्थानिक ग्रामस्थांची भीतीही दूर झाली. स्थानिकांनी बाचरे बंधूंच्या या कार्याचे कौतुक केले आहे.

