(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला काहीसा दिलासा दिला असला, तरी आता वादळी वाऱ्यांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला असला, तरी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरांचे पत्रे उडणे, गोठे व इतर मालमत्तांचे नुकसान होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
सोमवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळी काही काळ ऊन पडल्याने वातावरणात हलकासा दिलासा जाणवला. दिवसभर अधूनमधून किरकोळ सरी कोसळत राहिल्या, मात्र मुसळधार पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याचे चित्र दिसून आले. तरीही ढगाळ वातावरण कायम असल्याने गारव्यामध्ये वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली खेड तालुक्यातील जगबुडी नदी आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आज सकाळी १० वाजता पाणी पातळी ०६.९० मीटरपर्यंत खाली आली आहे. नदी इशारा पातळीवर असली तरी पूरस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणीपातळीही नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
हवामान विभागाने यापूर्वी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. त्यानंतर ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, पुढील दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यात सर्वाधिक १०२ मिलिमीटर पाऊस झाला असून, इतर सर्व तालुक्यांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. प्रतिकूल हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने शाळांना सुटीही जाहीर केली होती. पावसाचा वेग कमी झाल्याने आपत्तीग्रस्त भागातील मदत व पुनर्वसन कार्याला गती मिळाली आहे. विविध घटनांचे पंचनामे वेगाने सुरू असून, बाधित नागरिकांना आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्यांचा सर्वाधिक फटका महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेला बसला आहे. झाडे व फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजखांब वाकणे, तारा तुटणे आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची पथके युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत. पावसाचा जोर कमी झाला असला तरी वादळी वाऱ्यांचा धोका कायम असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, झाडांच्या व जीर्ण इमारतींच्या परिसरात थांबू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

