(रत्नागिरी)
कोकण रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यामुळे अपहरण झालेल्या दोन वर्षीय बालकाची सुटका करण्यात यश आले आहे. या प्रसंगानंतर संबंधित टीसीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२७ सप्टेंबर रोजी दादर–सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांना एका प्रवाशाचे वर्तन संशयास्पद वाटले. तो एका लहान बालकासोबत होता, मात्र त्यांच्यातील नात्याबाबत त्यांना संशय आला. चौकशीदरम्यान तो इसम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने चव्हाण यांचा संशय अधिक बळावला.
चालत्या गाडीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चव्हाण यांनी त्या व्यक्तीस रोखून धरले व तातडीने रेल्वे नियंत्रण कक्ष तसेच मुंबई व ठाणे लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयितासह बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीचे नाव अमोल अनंत उदलकर (४२, रा. इंदील, देवगड) असे निष्पन्न झाले. त्याने हे मूल मुंबईतील केईएम रुग्णालयातून अपहरण केल्याची कबुली त्याने दिली. बालकाचे नाव आयुष अजयकुमार हरिजन (वय २) असून त्याची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आजीकडे तो होता. आरोपीने तेथूनच त्याचे अपहरण केले होते.
या कार्यवाहीबद्दल कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी तात्काळ दखल घेत चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना १५ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले. विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते कोकण रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला.

