(रत्नागिरी)
शहरातील एसटी बसस्थानक परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात ८२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी निष्काळजीपणाने बस चालवणाऱ्या एसटी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू कोंड्या आखाडे (वय ५५) असे या एसटी चालकाचे नाव आहे.
फिर्यादी शैलेंद्र कमलाकर चव्हाण (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२) हे मेडिकलमधून औषध घेऊन घरी परतण्यासाठी एसटी डेपोकडे जात होते. याच दरम्यान भाट्ये रस्त्यावरून डेपोकडे भरधाव येणाऱ्या एसटीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि दुर्दैवाने त्यांच्या दोन्ही पायांवरून बसचे चाक गेले.
या गंभीर दुखापतीमुळे कमलाकर चव्हाण यांचा उपचाादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच एसटी प्रशासनाच्या वाहन सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शहर पोलिसांनी चालक बापू आखाडे याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरण्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.