(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण शहरातील प्राचीन आणि भव्य चिपळूणचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केवळ धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमापुरते मर्यादित नाही, तर सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
संपूर्ण मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे जवळपास ८०० गावं प्रभावित झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील मौजे पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथे ३५० बाधित कुटुंबांना मदत पोहोचविण्यासाठी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी “चला देऊ हात मदतीचा, आपल्या कृतज्ञतेचा” असे आवाहन केले होते. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत, चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळ यांनी प्रांताधिकारी यांच्या समन्वयातून पाकणी गावाला ७५० किलो गहू, २५० किलो तांदूळ व बिस्किटांच्या पुड्या स्वरूपात जीवनावश्यक मदत पुरवली.
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळा कदम, कार्याध्यक्ष श्री. तात्या खरे आणि सदस्य श्री. नितीन कोवळे यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले. चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळाच्या या सामाजिक योगदानामुळे चिपळूणच्या सांस्कृतिक भूमीवरील कृतज्ञतेची छाप समाजासमोर पुन्हा एकदा समोर आली आहे.

