(दापोली /रत्नागिरी)
अडखळ खाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या ४० वर्षीय मच्छीमाराचा मृतदेह अखेर सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात आढळून आला. रोहीदास यशवंत धरणकर (वय ४०, रा. श्रीवर्धन, मूळ रा. कोळीवाडा, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहीदास धरणकर आणि महेश पोशा चोलकर हे दोघे जेवण करून बोटीवर झोपले होते. २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास महेश चोलकर यांनी पर्शुराम बाळ्या चोगले यांना फोन करून रोहीदास बोटीवर दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर चोगले यांनी तातडीने अडखळ खाडी गाठून बोटीवर तसेच खाडीकिनारी रोहीदास यांचा शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर त्यांच्या श्रीवर्धन येथील नातेवाईकांशी संपर्क साधून ते गावी परतले आहेत का, याची चौकशी करण्यात आली. मात्र, रोहीदास गावी पोहोचले नसल्याचे समोर आले. त्यामुळे बोटीवरील खलाशी, ग्रामस्थ आणि इतरांनी मिळून अडखळ-अंजर्ले खाडी परिसरासह सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूच्या समुद्रात शोधमोहीम सुरू केली.
अखेर ४ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता सुवर्णदुर्ग किल्ल्यापासून सुमारे सात वाव अंतरावर समुद्राच्या पाण्यात रोहीदास यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक ७४/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याची नोंद आहे. याप्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५३ वाजता नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


