(दापोली / रत्नागिरी)
कृषी विद्यापीठांमध्ये विविध पिकांवर होणारे संशोधन, विकसित होणारे नवे तंत्रज्ञान तसेच सुधारित कृषी पद्धती केवळ संशोधन संस्थांपुरत्या मर्यादित न राहता कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शेतकरी सुखी, समाधानी आणि समृद्ध होण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती’च्या तीन दिवसीय बैठकीत मंत्री गोगावले बोलत होते.
यावेळी वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी व सहकार विभागाचे सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, सदस्य विनायक काशिद, सुधीर दळवी आदी उपस्थित होते.
मंत्री भरत गोगावले म्हणाले की, कोकणातील शेतकरी सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि ७२० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यादरम्यान असलेल्या मर्यादित जमिनीत शेती करतो. निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करूनही कोकणातील शेतकरी कधी खचला नाही आणि त्याने कधी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नाही. हा इथल्या मातीचा आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान आहे. राज्य शासनाने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले असून शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
महाराष्ट्र फळबाग लागवड आणि फळ निर्यातीत देशात अव्वल स्थानावर आहे. कोकणातील आंबा आणि काजू ही महत्त्वाची पिके असून हवामान बदल, मोहर गळणे, फळमाशी तसेच विविध कीड-रोगांमुळे बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. विद्यापीठाने विकसित केलेला आंबा फळमाशी ‘सांधा ट्रॅप’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्याचबरोबर फळांमधील साका, डिका आणि पर्णगुच्छ रोगांवर अधिक प्रभावी संशोधन होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
आंबा आणि काजूच्या बागांमध्ये मसाल्याची पिके, काळीमिरी आणि दालचिनी यांसारखी आंतरपिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे मुख्य पिकाचे नुकसान झाले तरी शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असे मंत्री गोगावले यांनी नमूद केले.
शेतीतून तरुणांना लाखोंचे उत्पन्न मिळावे
कृषी पदवीधर आणि शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाखोंचे उत्पन्न मिळवावे आणि स्वतः मालक बनावे. यातून गावातील तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला.
शेतीचा आर्थिक ताळेबंद बदलण्यासाठी ‘अॅसेट क्रॉप्स’वर भर : राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीतून बाहेर पडून बाजारपेठेची मागणी ओळखणे आणि नफा मिळवून देणाऱ्या ‘अॅसेट क्रॉप्स’वर भर देणे गरजेचे आहे. केवळ भरमसाठ उत्पादन घेणे हा शेतीचा उद्देश न राहता, त्या उत्पादनातून शेतकऱ्याला तसेच राज्याला थेट आर्थिक लाभ मिळणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी केले.
ते म्हणाले की, एखाद्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर शेतमालाचे दर कोसळतात आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पिकांचे ‘अॅसेट’ आणि ‘लायबिलिटी’ असे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. कोकणातील काजू, आंबा आणि मसाल्यांची पिके प्रामुख्याने ‘अॅसेट क्रॉप’ प्रकारात मोडतात. या पिकांमुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि राज्याच्या जीडीपीला बळ मिळते.
कृषी विद्यापीठांच्या बजेटमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून ते ६३५ कोटी रुपयांच्या घरात नेण्यात आले आहे. ‘विकसित भारत २०४७’च्या धर्तीवर राज्याचा कृषी आराखडा तयार केला जात आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा पोत आणि हवामान लक्षात घेऊन पिकांचे ‘क्रॉप मॅपिंग’ केले जाणार आहे.
जिल्हानिहाय ‘फॉरेक्स इंडेक्स’चा विचार
एखाद्या जिल्ह्याचा कृषी विभाग देशाला किती परकीय चलन मिळवून देतो, याचे मोजमाप करण्यासाठी जिल्हानिहाय स्वतंत्र ‘परकीय चलन निर्देशांक’ अर्थात ‘फॉरेक्स इंडेक्स’ तयार करण्याचा विचार शासन करत असल्याचे राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांचा उपद्रव हे कृषी विभागासमोरील मोठे आव्हान
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान हे कृषी विभागासमोरील गंभीर आव्हान आहे. विदर्भात वाघ आणि निलगाय, तर कोकणात वानरांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक आणि शास्त्रोक्त उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणारे अनुदान आणि यंत्रसामग्री जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रादेशिक न्याय राखण्याची भूमिका शासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत सातत्य राखले आहे. कर्जबाजारीपणापोटी येथील शेतकरी आत्महत्या करत नाही, ही अभिमानास्पद बाब आहे. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष समस्यांवर व्यवहार्य आणि उपयोगी संशोधन करावे, असे आवाहनही राज्यमंत्री जयस्वाल यांनी केले.
बदलते हवामान आणि आधुनिक तंत्रज्ञानावर कृषीमंत्र्यांचा भर
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेला संदेश यावेळी प्रदर्शित करण्यात आला. दापोली येथे आयोजित ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी या बैठकीस शुभेच्छा दिल्या. कोकणच्या निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध भूमीत ही बैठक होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आंबा, काजू आणि इतर विविध फळपिकांच्या क्षेत्रात होत असलेले संशोधन निश्चितच कौतुकास्पद असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
बदलते हवामान, पाण्याचा ताण, नवीन किडी व रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च ही शेतीसमोरील मोठी आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासोबतच शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरणारे नवीन वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन विकसित करणे ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम व समृद्ध करण्यासाठी या बैठकीतून महत्त्वपूर्ण दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कृषी व सहकार विभागाचे सचिव परिमल सिंह यांनीही मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात उल्लेखनीय संशोधन आणि कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करून मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली.


