महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या माजी वनमंत्री, दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे वयाच्या ५३व्या वर्षी निधन झाले.
१४ एप्रिल रोजी भारती लाड यांना चक्कर आल्यासारखे वाटल्याने त्यांना तातडीने सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना हेलिकॉप्टरद्वारे पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांच्या किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही, २८ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
घरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण असूनही भारती लाड या अत्यंत साध्या स्वभावाच्या होत्या. सामान्य लोकांत सहज मिसळून त्यांच्याशी संवाद साधण्यात त्या नेहमीच पुढे असायच्या. त्यांच्या प्रयत्नातून ‘भारती शुगर’, ‘डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल’ यांसारख्या अनेक संस्था उभ्या राहिल्या. डॉ. पतंगराव कदम यांना ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून घडवण्यात भारती लाड यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या स्मरणार्थ पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थांना ‘भारती’ हेच नाव दिले होते.
विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.’
भारती यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी सोनसळ (ता.कडेगांव) येथे झाला. पतंगराव कदम यांनी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. डॉ. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ भारतीताईंनी अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे पुढे डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांच्याच नावे सर्व संस्थांचे जाळे उभे केले. त्यामुळे “भारती” आज डौलाने विद्यादानाचे काम करत आहे. महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पद अशी जबाबदारी आल्याने गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. लाडकी कन्या ‘भारती’ यांच्या नावावरुन या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले होते. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत. भारती यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे.भारती लाड यांच्या निधनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.