(रत्नागिरी)
रत्नागिरी-पाली मार्गावरील हातखंबा टॅप परिसरात शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणारी कार अचानक मार्गावरील कठड्याला धडकली आणि क्षणार्धात पलटी होऊन पेट घेतला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून गाडीतील वडील व त्यांची लहान मुलगी दोघेही सुखरूप बचावले.
अपघातग्रस्त कार (एमएच-07 क्यू 8032) ही डॉ. मिहिर मुरलीधर प्रभुदेसाई (39, सिंधुदुर्ग) यांच्या ताब्यात होती. ते आपल्या मुलीसह रत्नागिरीकडे येत होते. हातखंबा-पाली परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आला होता. मात्र, मार्गबदलाचा फलक स्पष्ट दिसला नाही. परिणामी भरधाव वेगातील कार थेट समोरील दगडी कठड्याला धडकली. अपघात एवढा भीषण होता की कार पलटी होऊन काही क्षणातच पेट घेतला.

या दुर्घटनेत डॉ. प्रभुदेसाई जखमी झाले, तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली. सुदैवाने, गंभीर इजा न होता दोघेही सुखरूप बचावले. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल दाखल झाले व पाण्याच्या सहाय्याने गाडीवरील आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामुळे रत्नागिरी-पाली मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

