(पालघर)
आई म्हणजे मायेचा झरा असतो, लेकरांसाठी स्वतःचा जीवही अर्पण करणारी ती आईच असते. पण पालघरमधील एका घटनेने या प्रतिमेलाच काळिमा फासला आहे. धनसर गावातील घोरिला कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका आईने केवळ चिकनची मागणी केल्याच्या कारणावरून ७ वर्षांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला असून, या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचा तपशील
आरोपी महिला पतीपासून वेगळी राहत होती. ती दोन मुलांसह आणि दोन बहिणींसोबत घोरिला कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. मुलाने जेवणात चिकन हवे असा हट्ट केल्यावर त्याची आई संतापली आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी तसेच लाटण्याने मारहाण केली. यात मुलाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने मुलाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर जखमी असूनही आईने मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेले नाही. परिणामी रात्री उशिरा घरातच मुलाचा मृत्यू झाला.
स्थानिक रहिवाशांना मुलाच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला अटक केली. मारहाणीमध्ये वापरलेले लाटणे पोलिसांनी जप्त केले आहे. मृत मुलाची १० वर्षांची बहीण या घटनेमुळे पूर्णपणे घाबरलेली असून, तिच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तिला अनाथाश्रमात हलवले आहे.
पुढील तपास सुरू
सध्या आरोपी आईने मुलाच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, या प्रकरणामागे इतर कारणेही असू शकतात, असा स्थानिकांचा संशय आहे. मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

