(नवी दिल्ली)
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET UG 2026 पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एका आरोपीला अटक केली आहे. भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी पुण्यातील शिक्षिका मनीषा संजय हवालदार यांना शुक्रवारी (22 मे) अटक करण्यात आली. या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मनीषा हवालदार या सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला आणि महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्या NEET UG 2026 परीक्षा प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून सहभागी होत्या. त्यामुळे त्यांना भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश मिळाला होता. मनिषा 1992 पासून या संस्थेत फिजिक्स विषयाच्या अध्यापनाचे काम करत होत्या आणि 2024 मध्ये त्यांची प्राचार्या म्हणून नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच 30 जून 2026 मनिषा सेवानिवृत्त होणार होत्या, मात्र त्याआधीच त्या सीबीआयच्या जाळ्यात अडकल्या आहेत. तपासादरम्यान त्यांच्या भूमिकेबाबत महत्त्वाचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
भौतिकशास्त्र प्रश्नपत्रिका लीक प्रकरणातील मुख्य सूत्रधार?
सीबीआयच्या प्राथमिक तपासात मनीषा हवालदार या भौतिकशास्त्र प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी भौतिकशास्त्र विषयाशी संबंधित काही प्रश्न सहआरोपी मनीषा मांढरे यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेनुसार, हे प्रश्न NEET परीक्षेतील मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळणारे असल्याचे आढळून आले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मनिषा हवालदार यांची फिजिक्स विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. पेपर सेटिंग प्रक्रियेत त्या फिजिक्स विषयाच्या प्रमुख म्हणून काम करत होत्या, त्यामुळे त्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संपूर्ण माहिती उपलब्ध होती. मात्र, या पदाचा आणि गोपनीयतेचा गैरवापर करत त्यांनी एप्रिल 2026 दरम्यान परीक्षेतील काही प्रश्न सहआरोपी मनिषा मंधारे हिच्यासोबत शेअर केले. मनिषा मंधारेला सीबीआयने 16 मे 2026 रोजी आधीच अटक केली आहे. हवालदार यांनी दिलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळले असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
मनीषा मांढरे या पुण्यातील वनस्पतीशास्त्राच्या वरिष्ठ शिक्षिका असून त्यांनाही यापूर्वी दिल्लीमध्ये अटक करण्यात आली होती. त्या देखील NEET परीक्षा प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून नियुक्त होत्या आणि त्यांना वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा प्रवेश होता.
दिल्ली ते लातूरपर्यंत CBI ची धडक कारवाई
या संपूर्ण प्रकरणात सीबीआयने दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह विविध शहरांमध्ये धाडसत्र सुरू केले आहे. तपासादरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बँक व्यवहारांची माहिती जप्त करण्यात आली आहे. या डिजिटल आणि आर्थिक पुराव्यांचा सध्या सखोल तपास सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.या बहुचर्चित घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत या प्रकरणात एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून, नीट परीक्षेतील संभाव्य प्रश्न काही खासगी कोचिंग क्लासेसमार्फत विद्यार्थ्यांना पुरवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची वसुली केल्याची माहितीही तपास यंत्रणेला मिळाली आहे.
दरम्यान, मनिषा हवालदार यांच्या अटकेनंतर पेपरफुटीच्या मुख्य साखळीचा महत्त्वाचा धागा सीबीआयच्या हाती लागल्याचे मानले जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जप्त करण्यात आलेल्या तांत्रिक पुराव्यांचे विशेष पथकांकडून बारकाईने विश्लेषण सुरू असून, या संपूर्ण रॅकेटमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या अनेक व्यक्तींची ओळखही पटल्याची माहिती समोर येत आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने प्रश्नपत्रिका फुटीबाबत लेखी तक्रार दिल्यानंतर सीबीआयने 12 मे रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विशेष तपास पथके तयार करून देशभरात शोधमोहीम राबवण्यात आली. अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

