(ठाणे)
डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांना जबरदस्ती साडी नेसविण्याच्या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पगारे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि धीर देत आश्वासन दिले की, “मामा, घाबरू नका. काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. आपण लवकरच भेटू.” या संवादादरम्यान पगारे भावुक झाले. त्यांनी राहुल गांधींना सांगितले की, ते मुंबईत आल्यावर प्रत्यक्ष भेट व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.
नेमके प्रकरण काय?
दोन दिवसांपूर्वी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चुकीच्या पद्धतीने संपादित केलेला एक फोटो फॉरवर्ड केला होता. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना डोंबिवलीत रस्त्यावर बोलावून जबरदस्तीने साडी नेसवली आणि धमकावले. या घटनेनंतर धक्का बसलेल्या पगारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना उघडकीस आल्यानंतर कल्याण–डोंबिवलीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून भाजपविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कल्याण पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून पगारे यांचा रुग्णालयात जबाबही घेतला आहे. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संभाषणात मामा पगारे यांना राहुल गांधी म्हणाले की, “बाळासाहेब थोरात यांनी मला तुमच्याबद्दल सांगितले. तुम्ही गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेससाठी काम करत आहात, त्याचा मला अभिमान आहे.” राहुल गांधींच्या थेट संवादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला असून स्थानिक पातळीवर पगारे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

