(मुंबई)
भारतीय रेल्वेने साईनगर शिर्डी–तिरुपती दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, ३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या कालावधीत एकूण १८ विशेष फेऱ्या धावणार आहेत. या विशेष सेवेमुळे देशातील दोन प्रमुख धार्मिक स्थळे – शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि तिरुपतीचे तिरुमला बालाजी मंदिर – एकमेकांशी जोडले जाणार असून, या मार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठी सोय होणार आहे.
या विशेष गाड्या साप्ताहिक स्वरूपात धावतील. गाडी क्रमांक 07637 तिरुपती येथून प्रत्येक रविवारी पहाटे ४ वाजता सुटेल आणि सोमवारी सकाळी १०.४५ वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल. ही गाडी ऑगस्ट महिन्यात ३, १०, १७, २४ आणि ३१ तारखेला, तर सप्टेंबर महिन्यात ७, १४, २१ आणि २८ तारखेला धावेल.
त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 07638 साईनगर शिर्डी–तिरुपती विशेष गाडी प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७.३५ वाजता शिर्डी येथून सुटेल आणि बुधवारी पहाटे १.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. ही गाडी ऑगस्टमध्ये ४, ११, १८ आणि २५ तर सप्टेंबरमध्ये १, ८, १५, २२ आणि २९ तारखेला धावणार आहे.
या गाड्यांना दोन्ही दिशांनी रेणीगुंटा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, चिराळा, तेनाली, गुंटूर, सत्तेनपल्ली, पिडुगुरूल्ला, नाडीकुडे, मिऱ्यालागुडा, नालगोंडा, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद, नगरसोल, मनमाड आणि कोपरगाव या स्थानकांवर थांबा देण्यात आले आहेत.
गाडीच्या रचनेत एसी टू टियर, एसी थ्री टियर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे जनरल डबे अशा एकूण १८ डब्यांचा समावेश आहे. साईनगर शिर्डी व तिरुपती दरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने या मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष रेल्वे सेवेसाठी आरक्षणाची सुविधा १ ऑगस्टपासून सुरू होणार असून, प्रवासी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) तिकिटांचे आरक्षण करू शकतात.