(ठाणे)
कल्याण कोर्ट परिसरात उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनातच पोलीस कर्मचाऱ्यांवर चार कैद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने कैद्यांना पोलिस आणि न्यायालयाची भीती नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय आहे घटना
गुरुवारी दुपारी सुमारे 1.45 वाजता, वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस कल्याण कोर्ट परिसरात आणले होते. सरकारी पोलीस वाहन क्रमांक MH12 XQ 6855 मध्ये आरोपी आकाश वाल्मीकी, गणेश उर्फ शालु मरोठीया, योगींदर उर्फ भोलू मरोठीया, विवेक यादव बसले होते. पोलीस किशोर पेटारे यांनी त्यांना मागे बसण्यास सांगितले. मात्र, त्यावरून कैदी रागावले आणि पोलिसांवर धक्काबुक्की सुरु केली.
पोलिसांना मारहाण
आरोपींनी वर्दीतील पोलिसांच्या अंगावर हात टाकला आणि कॉलर पकडून दमदाटी केली. किशोर पेटारे यांना ठोश्याबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपी आकाश वाल्मीकी याने पेटारे यांच्या उजव्या कानावर बिर्याणीने भरलेली पिशवी मारली, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली. आरोपींनी शिवीगाळ केली, तर इतर पोलीस कर्मचारी देखील त्यांना रोखण्यात अपयशी ठरले. कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी आणि त्यांना कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला केला.
किशोर पेटारे यांच्या तक्रारीवरून, महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत.

