(लांजा/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी घाटातील तीव्र उतार पुन्हा एकदा अपघाताला कारणीभूत ठरला. शुक्रवारी सकाळी गोव्याच्या दिशेने कोळशाची वाहतूक करणारा ट्रक उतारावर अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ एफएल ५१५३ क्रमांकाचा ट्रक कोळसा घेऊन गोव्याच्या दिशेने निघाला होता. शुक्रवारी सकाळी सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणांतच ट्रक रस्त्यावर पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न केले.
आंजणारी घाटातील तीव्र उतार, धोकादायक वळणे आणि मुंबई-गोवा महामार्गावर वाढलेली अवजड वाहनांची वाहतूक यामुळे या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः उताराच्या ठिकाणी अवजड वाहनांचा वेग आणि नियंत्रणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आंजणारी घाटातील धोकादायक ठिकाणी वेगनियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजना, आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था आणि अपघात प्रतिबंधक उपाय तातडीने करावेत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून होत आहे.


