(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीची ५१ सदस्यीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, यात कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी अमृत अंकुश गोरे यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणूनही त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समाजहिताचे विविध उपक्रम राबविणाऱ्या अमृत गोरे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाल होळकर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर केली. कोकणातील धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. धनगर समाजाच्या वाडी-वस्त्यांना रस्ते व दळणवळण सुविधा मिळवून देणे, जातीचे दाखले व पडताळणी प्रक्रिया सुलभ करणे, घराखालची जमीन समाजाच्या नावे करून घेणे, जिल्हास्तरीय पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी प्रयत्न करणे, तालुकास्तरीय शैक्षणिक वसतिगृह व सांस्कृतिक सभागृह उभारणीचा पाठपुरावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविणे आदी महत्त्वाचे विषय या कार्यकारिणीतून राबविले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंतांचा सन्मान, शैक्षणिक मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती व शिबिरे हे उपक्रम हाती घेण्यात येतील. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरही महासंघ ठाम भूमिका घेणार असून, चालू असलेल्या आंदोलनांना कोकण प्रदेशाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
दरम्यान, ५१ पदाधिकाऱ्यांपैकी आठ जणांना जिल्हा प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग प्रभारी अमोल जंगले, रत्नागिरी प्रभारी अमृत गोरे, रायगड प्रभारी नरेश कोकरे, पालघर प्रभारी पांडुरंग गोरे, ठाणे प्रभारी संजय झोरे, मुंबई उपनगर प्रभारी संतोष पटकारे, मुंबई प्रभारी गुरुप्रसाद खरात व नवी मुंबई प्रभारी रामचंद्र शेळके यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील युवक नेतृत्व म्हणून अमृत गोरे यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील संघटनेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोकण प्रदेश कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, संघटन सरचिटणीस, चिटणीस, खजिनदार, लेखा परीक्षक, संपर्कप्रमुख, मीडिया प्रमुख, कायदेशीर सल्लागार अशा विविध जबाबदाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर व नवी मुंबई या सर्व जिल्ह्यांमधील प्रतिनिधींचा कार्यकारिणीत सहभाग आहे.
सर्वांनी एकत्र यावे…
“समाजाच्या दैनंदिन अडचणी सोडवणे, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने लढा देणे आणि पुढील पिढीला सुरक्षित भविष्य देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,” असे आवाहन कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारिणी जाहीर करताना केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत असून, कोकण प्रदेशात महासंघाच्या कार्याला नवे दिशा व बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

