(लांजा / प्रतिनिधी)
तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कुंभारवाडी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष शिवाजी मदने (वय २५) हा आपल्या ताब्यातील प्लॅटिना बजाज मोटारसायकल (क्रमांक एमएच १०/ईयू/७२८२) वरून सविता सचिन मदने आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा सार्थक यांना बसवून कोट ते लांजा या दिशेने जात होता. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथील कुंभारवाडी परिसरात, निरंकारी सत्संग मठ यांच्या मागील उतारावरील डायव्हर्जनजवळ रस्त्याच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या खडीवरून मोटारसायकल घसरली. वाहन वेगात व निष्काळजीपणे चालविल्यामुळे मागे बसलेल्या सविता मदने यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी फिर्यादी सचिन शिवाजी मदने (वय ३२, व्यवसाय मजुरी, मूळ रा. मिरज, जि. सांगली; सध्या रा. कोट, ता. लांजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संतोष मदने याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३६/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ)(ब), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गाचे काम सुरू असताना ठेकेदारांकडून दाखवली जाणारी बेफिकीरी आता थेट नागरिकांच्या जीवावर उठू लागली आहे. रस्त्यावर मनमानी पद्धतीने खडी टाकून ठेवणे, धोकादायक वळणांवर सुरक्षेची कोणतीही व्यवस्था न करणे हा कारभार अक्षरशः निष्काळजीपणाचा कळस म्हणावा लागेल. महामार्ग ठेकेदारांचा हा बेदरकारपणा आणि संबंधित यंत्रणांची ढिलाई यामुळेच असे अपघात घडत आहेत. “काम प्रगतीपथावर आहे” या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असतील, तर त्याची किंमत सामान्य नागरिकांना आपल्या जीवाने चुकवावी लागत आहे. एकूणच, महामार्गावरील सुरू असलेल्या कामांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

