आशिया कप २०२५ च्या सुपर फोर फेरीत भारताने बांगलादेशवर ४१ धावांनी मात करत १२व्यांदा अंतिम फेरीत मजल मारली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवत टीम इंडियानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव १९.३ षटकांत १२७ धावांवर आटोपला.
भारतीय डावात डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने तुफानी खेळी साकारली. त्याने केवळ ३७ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या, ज्यात ५ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. अवघ्या २५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत त्याने अडखळलेला डाव सावरला. मात्र, इतर फलंदाजांत शुबमन गिल (२९), शिवम दुबे (२), सूर्यकुमार यादव (५), तिलक वर्मा (५) आणि अक्षर पटेल (१०) फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
भारताच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात यश मिळवत बांगलादेशवर दबाव आणला. त्यानंतर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी मधल्या षटकांत सामन्याचा ताबा घेतला. कुलदीपने ४ षटकांत फक्त १८ धावा देत ३ बळी घेतले, तर वरुणने २ गडी बाद केले. या दोघांच्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा डाव १२७ धावांत कोसळला आणि भारताने ४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या विजयासह भारताने सुपर फोरमधील पहिले दोन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला आहे. बांगलादेशच्या पराभवानंतर श्रीलंका स्पर्धेबाहेर झाली आहे. भारताने यापूर्वी ८ वेळा (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८, २०२३) आशिया कप जिंकला आहे. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत नवव्या विजेतेपदासाठी उतरणार आहे.
दरम्यान, २६ सप्टेंबरला भारत श्रीलंकेविरुद्ध सुपर फोरचा शेवटचा सामना खेळणार असला तरी तो केवळ औपचारिकता ठरणार आहे, कारण टीम इंडियाने अंतिम फेरीसाठी आधीच पात्रता मिळवली आहे.

