(मुंबई)
भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना पत्नी डॉ. गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरी पालवे यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर गर्जे काही दिवस फरार होते. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने, त्यांच्या बाजूने जामिनाचा अर्ज लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.
गर्जे यांच्या जखमांवर कोर्टात स्पष्टीकरण
मंगळवारी रिमांड संपल्यामुळे पोलिसांनी गर्जेला पुन्हा शिवडी न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाने न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने ती मान्य केली. अनंत गर्जे याची पोलीस कोठडी संपत असताना त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अनंत गरजेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
आरोपीच्या शरीरावर आढळलेल्या २७ जखमांबाबत बचाव पक्षाने स्पष्टीकरण दिले. वकील मंगेश देशमुख म्हणाले,
- काही जखमा गौरी पालवे यांना घरातून बाहेर काढताना लागल्या,
- तर काही जखमा गर्जे यांनी पश्चातापाच्या भरात स्वतःला केल्या,
- विमानतळावरून परत आल्यावर दरवाजा न उघडल्याने फायर एक्झिटमधून घरात शिरताना त्यांना खरचटले,
- तसेच पोद्दार रुग्णालयात पत्नी मृत घोषित झाल्यानंतर भावनावश होऊन भिंतीवर डोके आपटले, असे त्यांनी सांगितले.
देशमुख यांनी म्हटले की, “गौरी यांच्या मृत्यूमागचे सत्य पुराव्यांनिशी स्पष्ट करू. गर्जे यांच्यावरचे आरोप तथ्यहीन आहेत.”
डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीसांनी आता एफआयरमध्ये नाव नमूद असलेल्या अनंत गर्जे यांच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे. डॉ. गौरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या हाताला काही महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आली होती. या कागदपत्रांमध्ये एका महिलेचे नाव तसेच पतीच्या नावाच्या ठिकाणी अनंत गर्जे (गौरीचे पती) आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए यांचा उल्लेख होता. संबंधित कागदपत्रे गर्भपाताशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. ही माहिती पाहून गौरी मानसिकदृष्ट्या हादरल्या होत्या. काही दिवस त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतरही अनंत गर्जे आणि त्या महिलेचे संबंध असल्याचे गौरीला समजल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
आत्महत्येपूर्वी गौरीने पतीच्या कथित अफेअरबाबत आपल्याच कुटुंबीयांना माहिती दिली होती. त्याच आधारावर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीत उल्लेखित महिलेचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली. वरळी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेने आपल्या जबाबात काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. ती म्हणाली की, २०२२ नंतर तिचा आणि अनंत गर्जे यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. ती त्यांच्या संपर्कातही नव्हती, असेही तिने सांगितले. गौरींना घरी सापडलेल्या कागदपत्रांविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही, असेही तिने पोलिसांना स्पष्ट केले.
प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांच्या नणंद शीतल गर्जे-आंधळे, आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.

