(नवी दिल्ली)
मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना 2023 साठीचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे.
पीएम मोदींकडून कौतुक
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘X’ (Twitter) वर पोस्ट करून ही घोषणा केली. “मोहनलाल यांचा उल्लेखनीय प्रवास पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देतो. दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांचा सन्मान केला जात आहे,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मोहनलाल यांचे कौतुक केले. “मोहनलाल हे उत्कृष्ट आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत. अनेक दशकांच्या समृद्ध कारकिर्दीमुळे ते मल्याळम सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे,” असे मोदी म्हणाले.
‘द कम्प्लिट ॲक्टर’ चा सर्वोच्च सन्मान
चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत मोहनलाल यांनी 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चाहत्यांनी त्यांना ‘द कम्प्लिट ॲक्टर’ म्हणून गौरवले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 2001 मध्ये पद्मश्री, तर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गेल्या वर्षी 2022 चा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला होता. यंदा मात्र हा सर्वोच्च सन्मान मोहनलाल यांच्या नावे होत असून, संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

