(मुंबई)
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. अंतरवाली सराटी या गावाहून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांना २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यांच्या या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता मुंबईकडे लागले आहे.
दरम्यान, जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच भाजपकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर “इतिहास कर्तृत्ववानांचाच लक्षात ठेवतो” असा मजकूर लिहिण्यात आला आहे तसेच “मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस” आणि “उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे फडणवीस” असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांची नावेही दिसत आहेत. त्यामुळे जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मनोज जरांगे पाटील हे सध्या पुणे जिल्ह्यात दाखल झाले असून जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते पुढे मार्गस्थ होणार आहेत. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या त्यांच्या ठाम मागणीसाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार असून ते नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

