(रत्नागिरी)
राज्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांसह 9 पंचायत समित्यांतील 112 गणांसाठी मतदान प्रक्रिया आज होत आहे. मतदानासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (9 फेब्रुवारी 2026) रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर निकाल जाहीर होतील आणि आचारसंहिता संपुष्टात येईल.
गुरुवारी रात्री 10 वाजता प्रचार थंडावल्यानंतर शुक्रवारी उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी आणि स्थानिक पातळीवरील संपर्कावर भर दिला होता. आज शनिवारी मतदान पार पडणार असून सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. त्याच दिवशी ‘मिनी मंत्रालयावर’ कोणाचा झेंडा फडकणार, हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत राज्यातील 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार आपला कौल देणार आहेत. यामध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष आणि 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 468 इतर मतदारही मतदानाचा हक्क बजावतील.
जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 151 उमेदवार तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 321 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 11 लाख 73 हजार 899 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी जिल्ह्यात 1,693 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे प्रचाराचा कालावधी संक्षिप्त झाला असला, तरी यंदाच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील रणनीती अधिक प्रभावी ठरल्याचे चित्र दिसले. मोठ्या सभांपेक्षा कॉर्नर सभा, वाडी-वस्तीवरील भेटी, गावपातळीवरील प्रचार फेऱ्या आणि मतदारांशी थेट संवाद यावर सर्वच पक्षांनी भर दिला. कोकणात वाडीप्रमुख आणि गावकरांचा प्रभाव अधिक असल्याने स्थानिक संपर्क महत्त्वाचा ठरला.
शिंदे शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री रामदास कदम, आमदार किरण सामंत हे प्रचारात आघाडीवर होते. राष्ट्रवादीकडून आमदार शेखर निकम, तर ठाकरे शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांनी काही भागांत प्रचाराचा किल्ला लढवला. माजी खासदार विनायक राऊत यांनीही प्रचारात सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिपळूण येथील सभा ऐनवेळी रद्द झाली, तर शिंदे शिवसेनेच्या दोन मोठ्या सभा झाल्या. एकूणच मोठ्या नेत्यांच्या कमी सभा आणि स्थानिक प्रचारावर जोर, असे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
प्रशासन सज्ज, कडेकोट बंदोबस्त
मतदान प्रक्रियेसाठी 4,266 मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली असून 5,455 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 76 पोलीस अधिकारी, 1,524 पोलीस अंमलदार आणि 1,900 होमगार्ड तैनात असतील. अतिसंवेदनशील भागांसाठी SRPFच्या दोन तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतील आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
महिला मतदार ठरणार ‘गेमचेंजर’
यंदाच्या निवडणुकीत महिला मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. जिल्ह्यात एकूण 6,08,993 महिला मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 5,64,976 इतकी आहे. म्हणजेच महिला मतदार 44,017 ने अधिक आहेत. त्यामुळे महायुती असो वा महाआघाडी, सर्वच पक्षांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
तालुकानिहाय जागा
मंडणगड: गट 2 | गण 4
दापोली: गट 6 | गण 12
खेड: गट 6 | गण 12
चिपळूण: गट 10 | गण 20
गुहागर: गट 5 | गण 10
संगमेश्वर: गट 7 | गण 14
रत्नागिरी: गट 10 | गण 20
राजापूर: गट 6 | गण 12
लांजा: गट 4 | गण 8
दोन मते कशी द्यावीत आणि ईव्हीएमची रचना
प्रत्येक मतदाराला या निवडणुकीत दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषद गटासाठी आणि दुसरे मत पंचायत समिती गणासाठी असेल. जिल्हा परिषद उमेदवारासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल, तर पंचायत समितीसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ईव्हीएमवर पाहायला मिळेल.
मतदान नक्की करा; तुमचं एक मत ठरवणार गावाचा विकास
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (ता. 7) मतदान होत आहे. या निवडणुका म्हणजे आपले गाव व परिसराचे भवितव्य ठरविणाऱ्या असतात. म्हणूनच या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर या निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाहीचा पाया बळकट करण्यातही हातभार लाऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करून आपण मतदानाचा आपला बहुमोल हक्क बजवायलाच हवा, त्यासाठी आपण नक्की मतदान करावे, असे मी सर्व संबंधित मतदार बंधू- भगिनींना नम्रपणे आवाहन करतो, असे आवाहन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानी केले आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या गावाच्या विकासाचा पाया असतात. आपल्या भागाच्या उन्नतीसाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने वेळ काढून आवर्जून घराबाहेर पडून आपला बहुमोल हक्क बजावावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.
आजच्या मतदानातून रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण सत्ताकारणाची दिशा ठरणार असून, निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

