(नाशिक)
पुण्यातील मुलीशी समलैंगिक विवाह केल्याची बाब लपवून नाशिकच्या एका तरुणाशी लग्न करणाऱ्या महिलेमुळे खळबळ उडाली आहे. मोबाईलमधील माहितीमुळे तिचं रहस्य उघड झालं आणि पतीला मोठा धक्का बसला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात महिला आणि तिच्या आई-वडिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समलैंगिक विवाह लपवून तरुणाशी लग्न
तक्रारदार तरुण मनोहर (नाव बदललेलं आहे) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी सविता (नाव बदललेलं आहे) हिने 7 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यातील काजल (नाव बदललेलं आहे) हिच्यासोबत समलैंगिक विवाह केला होता. ही बाब माहिती असूनही, सविताच्या पालकांनी तिचं लग्न 2 जून 2024 रोजी मनोहर याच्यासोबत जबरदस्तीने लावून दिलं. लग्नात दिलेले सुमारे 7 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तिच्या पालकांनी स्वतःकडे ठेवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
वैवाहिक आयुष्य सुरळीत न झाल्यानं संशय
पतीनं तक्रारीत म्हटलं आहे की, “लग्नानंतर पत्नीनं एकदाही जवळ येऊ दिलं नाही. ‘तू मला हात लावला तर आत्महत्या करेन,’ अशी धमकी ती देत असे. सतत मोबाईलवर बोलणे, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग सुरू असल्याने माझा संशय वाढला.”
एका प्रसंगी पत्नी माहेरी गेली असताना, तिचा मोबाईल घरी राहिला होता. त्यावेळी तिच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स, व्हिडिओ कॉल्स आणि समलैंगिक विवाहाशी संबंधित माहिती मिळाल्याचं पतीनं नमूद केलं आहे. विचारणा केली असता, सविता हिनं “पुरुषांमध्ये मला काही रस नाही, माझं घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावलं आहे,” असं सांगत शिवीगाळ केली असल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, सविता हिनं “तुझा गेम करते” अशा धमक्या दिल्या होत्या. तसेच तिनं लग्नात मिळालेलं सोन्याचं गंठण माहेरी हरवल्याचं खोटं सांगितल्याचंही नमूद आहे.
नाशिकरोड पोलिसांनी सांगितलं की, “न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पतीनं पत्नी आणि तिच्या आई-वडिलांविरोधात फसवणुकीची तक्रार केली असून, दागिन्यांच्या अपहाराचाही आरोप करण्यात आला आहे.”

