(मुंबई)
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या बॅगा आणि पर्स चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून २२ लाख २४ हजार ७६९ रुपयांचा ऐवज, त्यात ३१५ ग्रॅम सोनं आणि ७२ हजार रुपये रोख रक्कम, असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
कोईंबतूर-राजकोट एक्सप्रेसमधील चोरीने उघडकीस आणली टोळी
23 ते 24 मे दरम्यान कोईंबतूर-राजकोट एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या पँटचा खिसा धारदार वस्तूनं कापून त्याच्याकडील ३.६० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. यासंदर्भात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी अशा प्रकारच्या अनेक चोऱ्यांची कार्यपद्धती समान असल्याचे लक्षात घेऊन तपासाची चक्रं वेगानं फिरवली.
दोन आरोपी ताब्यात; १६ गुन्ह्यांची कबुली
25 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर, पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून वकार आलम तौकिर खान (३९, गाझीपूर, उत्तर प्रदेश) आणि जुगल किशोर ओमप्रकाश विश्वकर्मा (४१, कानपूर, उत्तर प्रदेश) या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी अजून चार साथीदारांसोबत मिळून १६ चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचं जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी सांगितलं. ही टोळी रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होती. पोलिसांनी या गुन्ह्यांमधून सोन्याचे बांगडे, अंगठ्या, लॉकेट आणि मोठी रोख रक्कम हस्तगत केली आहे.

