(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख शहराचे प्रवेशद्वार मानला जाणारा बाजीराव पेशवे उद्यान–बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला हा मुख्य रस्ता दिवाळीपूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर आणि पंकज पुसाळकर यांनी दिली.
शहरातील चोरपऱ्या–बसस्थानक मार्गासह अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निकम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
याआधीही आमदार निकम यांनी विविध निधीतून देवरूख नगर पंचायतीला लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून काही रस्त्यांची कामे झाली; मात्र पावसाळ्यात केलेली मलमपट्टी वाहून गेल्याने रस्त्यांची दुरवस्था कायम राहिली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
या मागणीची दखल घेत आमदार निकम यांनी चोरपऱ्या–पंचायत समिती–एसटी बसस्थानक–मशिद हा रस्ता दिवाळीपर्यंत दुरुस्त होईल, अशी खात्री दिली.
निवेदन देताना शहराध्यक्ष हनिफशेठ हरचिरकर, बाळुशेठ ढवळे, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, बंडू जाधव, दीपक खेडेकर, रविंद्र लाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

