(रत्नागिरी)
कोकणातील रत्नागिरीस्थित फिनोलेक्स अकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांच्या टीमने विकसित केलेल्या “IndiCropGenius: Precision Farming with AI Insight” या नाविन्यपूर्ण मोबाइल अॅप्लिकेशनला भारत सरकारच्या कॉपीराइट निबंधक कार्यालयामार्फत अधिकृत कॉपीराइट नोंदणी प्राप्त झाली आहे.
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डेटा-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शाश्वत आणि अचूक मार्गदर्शन मिळावे, यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. IndiCropGenius अॅपमुळे शेतकरी पीक व्यवस्थापन, मातीची काळजी, खतांचा कार्यक्षम वापर आणि हवामानाधारित निर्णय अधिक प्रभावीपणे घेऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तन्मय श्रीकांत जोगळेकर, वैभव प्रकाश बागवे, अरमान अब्दुलहमीद राऊत, प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर (मार्गदर्शक) हे या संशोधन प्रकल्पाचे लेखक व मालक आहेत.
या यशाबद्दल बोलताना टीमने सांगितले की, “ही नोंदणी आमच्या संशोधन कार्याची दखल असून यामुळे पुढे समाज आणि शेतकरी बांधवांसाठी अधिक परिणामकारक उपाय विकसित करण्याची प्रेरणा मिळेल.”
विद्यार्थ्याना एमसीए विभागाच्या प्रकल्प मार्गदर्शक प्रा. वामन परूळेकर यांनी मार्गदर्शन केले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव, विभाग प्रमुख प्रा. तेजस जोशी, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. वामन परूळेकर, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांनी केले.
कोकणातील संशोधक विद्यार्थ्यांचे हे यश सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून त्यांचे अभिनंदन होत आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडणाऱ्या नव्या क्रांतीचे हे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.

