(संगमेश्वर)
ह्युमन राईट्स प्रोटेक्शन रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष सुलतान हुसैन हफसानी, रा. सोनगिरी ता. संगमेश्वर यांच्या पाठपुराव्याने सोनगिरी येथे एसटी बसेससाठी थांबा मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्ग ६६ क्रमांक वरील सोनगिरी येथे एसटी बसेससाठी थांबा मंजूर असूनही काही बेजबाबदार वाहक-चालक येथील स्टॉपवर बस थांबवत नव्हते. काही वाहक चालक येथे स्टॉप नाही, बस थांबणार नाही असे सांगायचे, तर काहीवेळा सोनगिरी स्टेज नाही, तिकीट निघत नाही अशी कारणे देत सोनगिरी येथे बस थांबविण्यासाठी नकार देत होते.
याबाबत हयुमन राईटस जिल्हा उपाध्यक्ष सुलतान हफसानी यांनी पाठपुरावा करुन माहीतीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली. याप्रकरणी त्यांना विभाग नियंत्रक श्री. बोरसे, वाहतुक अधिकारी श्री. यादव, श्री श्रेयस तळेकर, श्री. वेल्हाळ, श्री. सचिन सुर्वे यांचेसह आगार प्रमुख तसेच सर्व आधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळे सोनगरी येथे एसटी च्या सर्व लाँग रुटच्या तसेच लाल बोर्डाच्या मर्यादित थांब्याच्या, जिल्हयातीत सर्व आगारातून रत्नागिरीकडे येणाऱ्या व रत्नागिरीतुन अन्य भागात जाणाऱ्या बसेससाठी सोनगिरी येथे अधिकृत थांबा असल्याचे पत्र एसटी प्रशासनाने दिले आहे.