(विल्ये / अमित कांबळे)
भीमशक्ती जलसा कला निकेतन, रत्नागिरी यांच्या माध्यमातून जलसा निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्षाच्या शुभारंभानिमित्त “गीत बहार सप्तसुरांचा पर्व–१” या जिल्हास्तरीय भव्य जलसा गीत गायन स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आनंदनगर, लाजुळ नरमे येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी सुरुवातीला १५ जलसा मंडळांना सहभागी होण्याची संधी देण्यात येणार होती. मात्र स्पर्धेची घोषणा होताच अवघ्या काही दिवसांत तब्बल १९ जलसाकार मंडळांनी नाव नोंदणी केल्याने आयोजकांना नोंदणी पूर्ण झाल्याची घोषणा करावी लागली. जलसा या प्रबोधनात्मक लोककलेबाबत नव्या पिढीमध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेला उत्साह यामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक मंडळाने निवेदनासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित एक गीत आणि माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक गीत, असे सादरीकरण १५ मिनिटांच्या वेळेत करायचे आहे.
बक्षिसांचे स्वरूप
प्रथम क्रमांक: ७,१०१ रुपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र
द्वितीय क्रमांक: ५,१०१ रुपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र
तृतीय क्रमांक: ३,१०१ रुपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र
उत्तेजनार्थ बक्षिसे:
प्रथम उत्तेजनार्थ: १,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र
द्वितीय उत्तेजनार्थ: १,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र
याशिवाय उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट ढोलकी वादक आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक यांना प्रत्येकी ५०० रुपये रोख व गौरवपत्र देण्यात येणार आहे.
ही माहिती आयोजक मंडळातील विजय रामचंद्र सावंत (गुरुवर्य), गौतम पांडुरंग सावंत (कवी), सुधाकर शंकर सावंत (कवी व गायक) तसेच भीमशक्ती जलसा कला निकेतन, लाजुळ, रत्नागिरी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या उपक्रमाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील विविध जलसाकार मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आयोजकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

