(इंफाळ)
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आणि किमान तीन जवान जखमी झाले. घटना नांबोल सबल लेइकाई परिसरात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा जवान इंफाळहून बिष्णुपूरच्या दिशेने जात होते. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले.
वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यात एका कनिष्ठ अधिकारी (जेसीओ) आणि एका जवानाचा मृत्यू झाला, तर दोन जवान जखमी झाले. हल्लेखोरांनी व्यस्त रस्त्यावर वाहनावर गोळीबार केल्यानंतर पांढऱ्या व्हॅनमधून पळ काढला. नागरिकांना हानी होऊ नये म्हणून जवानांनी संयम दाखवला आणि प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी सघन शोधमोहीम सुरू केली आहे.
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी म्हटले की, “अशा घृणास्पद हल्ल्यांना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.”
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की, “२ जवान शहीद आणि इतर जखमी होण्याची घटना अत्यंत दु:खद आहे. शहीदांचे शौर्य आणि बलिदान कायम स्मरणात राहील. या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी.” सुरक्षा दलांच्या तपासात हे लक्षात आले की, हल्ल्यामागे मोठा कट असण्याची शक्यता आहे आणि आसाम रायफल्सच्या मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचा देखील तपास सुरू आहे.
इंफाळ खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमधून सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यात बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (पीडब्ल्यूजी) संघटनेचे चार सक्रिय कार्यकर्ते समाविष्ट आहेत. या चौघांकडून दोन एसएलआर रायफल, दोन रायफल, नऊ मॅगझिन आणि ९९ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय प्रतिबंधित प्रेपाक (प्रो) आणि सोरेपा संघटनेच्या प्रत्येकी एका सक्रिय कार्यकर्त्यालाही अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एक बनावट बंदूक आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.

