(रत्नागिरी /प्रतिनिधी)
भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास अत्यावश्यक असून या भाषेच्या अध्ययनातून बौद्ध साहित्याचा आणि धम्माचा मूळ गाभा समजून घेता येतो, असा सूर रत्नागिरी येथे आयोजित पाली भाषा अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात उमटला. मुंबई विद्यापीठाच्या मान्यतेने राबविण्यात आलेल्या डिप्लोमा इन पाली भाषा अभ्यासक्रमात शंभर टक्के निकालासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुंबई विद्यापीठांतर्गत सिद्धार्थ महाविद्यालय (कला, विज्ञान व वाणिज्य) यांच्या मान्यतेने प्रा. दिलीप वासनिक यांच्या पुढाकारातून रत्नागिरी जिल्ह्यात डिप्लोमा इन पाली भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. या अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या दहा विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण होत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विपश्यना केंद्र, गयाळवाडी (रत्नागिरी) येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाची प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन आणि त्रिसरण-पंचशील ग्रहणाने झाली. विद्यार्थिनी अनामिका जाधव यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला प्रसन्न वातावरण लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय जाधव होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाली भाषा अभ्यासक प्रा. विनोद भेले, प्रा. सुशीला जोपुलकर, प्रा. दिलीप वासनिक आणि प्रा. संतोष जोपुलकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात एन. बी. कदम यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. त्यानंतर प्रदीप जाधव, संजय आयरे, विजय गो. जाधव, जयेश जाधव आणि जे. पी. जाधव यांनी मनोगते व्यक्त करत पाली भाषेच्या अध्ययनाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. विनोद भेले यांनी भगवान बुद्धांनी तत्कालीन समाजाशी संवाद साधण्यासाठी लोकभाषेचा स्वीकार केला आणि तीच भाषा पुढे पाली म्हणून ओळखली गेली, असे सांगत पाली भाषेतील साहित्याचा अभ्यास करून बुद्धांचे तत्त्वज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. पाली भाषेच्या अध्ययनातून केवळ भाषिक ज्ञान नव्हे, तर मानवकल्याणाचा विचार आणि समतावादी जीवनमूल्येही आत्मसात होतात, असे त्यांनी नमूद केले.
प्रा. दिलीप वासनिक, प्रा. सुशीला जोपुलकर आणि प्रा. संतोष जोपुलकर यांनीही पाली भाषेच्या अभ्यासाचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. अध्यक्षीय समारोपात विजय जाधव यांनी, भगवान बुद्धांचा धम्म समजून घेण्यासाठी आणि तो आचरणात आणण्यासाठी पाली भाषा शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले. बुद्धांचा धम्म हा कल्याण, हित आणि सुखाचा मार्ग दाखवणारा असून त्याचा प्रसार समाजात अधिक व्यापकपणे व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अनामिका जाधव आणि संघमित्रा कुरतडकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि नियोजनबद्ध आयोजनामुळे प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

