(मुंबई)
राज्य सरकारने आज (शुक्रवार, ३ ऑक्टोबर) रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेत राज्यात ई-बॉण्ड (इलेक्ट्रॉनिक बॉण्ड) प्रणाली सुरू केली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या नवीन प्रणालीची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात प्रथमच सुरू होत असलेल्या या ई-बॉण्ड प्रणालीमुळे आयातदार व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत व्यवहारांसाठी कागदी बॉण्ड आवश्यक होता, मात्र आता त्याची गरज राहणार नाही. ई-बॉण्डची पडताळणी थेट कस्टम अधिकारी ऑनलाईन करतील, त्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक व कागदरहित होणार आहे.
ई-बॉण्डचे फायदे :
- मुद्रांक शुल्काचा भरणा ऑनलाईन करता येणार.
- किमान ५०० रुपयांपासून शुल्क ऑनलाईन भरता येईल.
- आयातदार-निर्यातदार आणि कस्टम अधिकाऱ्यांकडून ई-स्वाक्षरीची सुविधा.
- तत्काळ ऑनलाईन पडताळणीची सुविधा.
- वेळेची बचत व व्यवहारातील पारदर्शकता वाढणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा निर्णय राज्यातील व्यापार-व्यवहार अधिक सुलभ व आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

