नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांचे नियोजन जोरात सुरू होते. परवडणारा आणि सुखकर प्रवास म्हणून अनेक जण रेल्वेची निवड करतात. यंदाही कुटुंबासह पर्यटनाचा बेत करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग सुरू केले असून, मुलांच्या तिकिटांबाबत महत्त्वाचे नियम अद्ययावत केले आहेत. पालकांनी हे नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
५ वर्षांखालील मुलांसाठी नवा नियम
भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे की ५ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले तिकीटाशिवाय प्रवास करू शकतात, परंतु सीट किंवा बर्थ हवी असल्यास पूर्ण भाडे द्यावे लागणार आहे. आयआरसीटीसीने याबाबत गोंधळ टाळण्यासाठी त्यांच्या पोर्टलवर ‘NOSB – No Seat/No Berth’ हा पर्याय स्पष्टपणे दाखवण्यास सुरुवात केली आहे.
तिकीट बुकिंगदरम्यान वय योग्य नोंदवणे आवश्यक
बुकिंगदरम्यान मुलांचे योग्य वय नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीचा वय पर्याय निवडल्यास तिकीट रद्द होऊ शकते.
प्रवासादरम्यान टीटीई मुलाच्या वयाचा पुरावा मागू शकतो, त्यामुळे—
- आधारकार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- शाळेचे ओळखपत्र
यापैकी कोणतेही दस्तऐवज सोबत ठेवणे आवश्यक आहे.
५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष पर्याय
या वयोगटातील मुलांना सीट/बर्थ नको असल्यास बुकिंगदरम्यान NOSB पर्याय निवडता येतो. या वेळी अर्धे भाडे आकारले जाते. परंतु सीट किंवा बर्थ हवी असल्यास पूर्ण प्रौढ भाडे द्यावे लागेल. तर १२ वर्षांवरील मुलांना प्रौढ प्रवासी मानले जाईल व त्यांचे तिकिट बुकिंग, भाडे आणि बर्थचे नियम नियमित प्रवाशांप्रमाणेच राहतात.

