(रत्नागिरी / वार्ताहर)
लाजूळ गावातील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी रत्नागिरी आगारातून सुटणारी रत्नागिरी-लाजूळ एसटी बस पूर्वीप्रमाणे सकाळी ८.२० वाजता सुरू करण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी रत्नागिरी-लाजूळ ही एसटी बस सकाळी ८.२० वाजता रत्नागिरी आगारातून सुटत होती. त्यामुळे ती सकाळी ९.२० वाजेपर्यंत लाजूळ येथे पोहोचत असल्याने शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, मजूर तसेच नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होत होती.
मात्र, या बसच्या वेळापत्रकात बदल करून ती सकाळी ७.२० वाजता सोडण्यात येत असल्याने या फेरीचा लाभ अनेकांना मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, बस उपलब्ध नसल्यामुळे लाजूळ ते करकुडे या मार्गावर काही विद्यार्थ्यांना सुमारे एक तास पायी चालत जावे लागत आहे, अशी बाबही निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
यापूर्वीही हायस्कूल व प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सह्यांसह रत्नागिरी आगार व्यवस्थापकांकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याची खंतही बहुजन समाज पार्टीने व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी-करकुडे (लाजूळमार्गे) एसटीची सकाळी ८.२० वाजताची फेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश गोपीनाथ सावंत, विधानसभा प्रभारी किशोर लुकाजी पवार, विधानसभा महासचिव राजेश जाधव, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, रत्नागिरी शहराध्यक्ष रुपेश कांबळे तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

