(मुंबई)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ही देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते. राष्ट्रीयीकृत, खासगी, सरकारी आणि अर्बन बँकांकडून बँकिंग रेग्युलेशन कायदा आणि इतर नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर आरबीआय नियमितपणे देखरेख करते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास आरबीआयकडून आर्थिक दंड किंवा कठोर कारवाई केली जाते.
अलीकडेच आरबीआयने देशातील ५ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, मुंबईतील एक बँक आणि अहमदाबादमधील एक बँक यांचा समावेश आहे.
कारवाईत समाविष्ट बँका व दंड
- जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड – नो यूवर ग्राहक संदर्भातील नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन; १५ सप्टेंबरच्या आदेशानुसार ३.५० लाख रुपये दंड.
- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – १५ सप्टेंबरच्या आदेशानुसार ४.५ लाख रुपये दंड.
- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – १९५६ च्या बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या सेक्शन २० व सेक्शन ५६च्या तरतुदींचे उल्लंघन; १ लाख रुपये दंड.
- भारत को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबई लिमिटेड – सायबर सुरक्षा नियमांचे उल्लंघन; ३.७५ लाख रुपये दंड.
- गुजरातमधील द अहमदाबाद मर्चंटाईल सहकारी बँक लिमिटेड अहमदाबादला 23 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
आरबीआयनं वरील बँकांना केलेल्या आर्थिक दंडांबाबतची स्वतंत्र आणि सविस्तर प्रसिद्धीपत्रकं आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आरबीआयच्या या कारवाईमुळे संबंधित बँकांना नियमांचे पालन करण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे पुन्हा अधोरीखीत झाले आहे.

