(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा गाजावाजा सुरू असतानाच संगमेश्वर शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. मुख्य महामार्गाच्या कामाला प्राधान्य देताना शहरातील जोडरस्त्यांकडे अक्षरशः पाठ फिरवल्याने नागरिक, व्यापारी, प्रवासी आणि वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख जोडरस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले आहे. अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे संगमेश्वर बसस्थानक परिसरातही पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. बसस्थानकातून मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा मार्ग चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे पूर्णतः उखडून गेला आहे. पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले असून दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. माभळे–संगमेश्वर सोनवी पूल जोडरस्ता, सोनवी पुलाखालून देवरुखकडे जाणारा मार्ग तसेच बसस्थानक–देवरुख रस्त्याचीही अशीच बिकट अवस्था झाली आहे. प्रत्येक पावसानंतर रस्त्यांवरील खड्डे अधिक खोल होत असून वाहतूक धोकादायक बनली आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना पर्यायी जोडरस्ते सुरक्षित, मजबूत आणि वाहतुकीयोग्य ठेवणे ही संबंधित यंत्रणांची मूलभूत जबाबदारी होती. मात्र प्रत्यक्षात या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांना चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीत ढकलण्याचा प्रकार सुरू असल्याची संतप्त भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. प्रसिद्ध व्यापारी दिलीप रहाटे म्हणाले, “जोडरस्ते चिखलमय आणि खड्डेमय झाल्याने ग्राहकांना बाजारपेठेत येणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यापारावर मोठा परिणाम होत आहे. चौपदरीकरणाच्या कामासोबत जोडरस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणे आवश्यक होते. संबंधित यंत्रणेने तातडीने चिखल हटवून खड्डे बुजवावेत आणि रस्ते वाहतुकीयोग्य करावेत.”
दरम्यान, संगमेश्वरवासीयांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाने केवळ कागदी दावे न करता प्रत्यक्षात रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभारावी आणि जोडरस्ते सुरक्षित करावेत, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा चौपदरीकरणाच्या विकासकामांबाबत नागरिकांचा असंतोष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

